
शिवनेरी सेवा मंडळाच्या कबड्डी महोत्सवात अमर हिंद मंडळ, जय भारत, यश, विश्वशांती आणि मुंबई पोस्टल यांनी प्रतिस्पर्ध्यांना चीतपट करत विजयी आगेकूच केली. महिला गटात सेजल कांबळेच्या आक्रमक चढायांच्या जोरावर अमर हिंदने भारतमाता महिला संघाला 45-30 असे नमवले.
कुमार गटात जय भारत सेवा मंडळाने आकांक्षा क्रीडा मंडळाला 36-24 असे लोळवले. आर्यन बावडेकरच्या चढाया आणि तन्मय बावकरच्या पकडी निर्णायक ठरल्या. यश क्रीडा मंडळाने पंचगंगा सेवा मंडळावर 35-31 अशी मात करत विजय मिळवला. महिला गटात विश्वशांती क्रीडा मंडळाने गोल्फादेवी प्रतिष्ठानला 32-25 असे हरवले. रोझी डिसोझा आणि शीतल मेरांडे यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला.
व्यावसायिक गटात बेस्टने टीबीएमला 36-31, तर पी. डी. हिंदुजा संघाने आरबीएससीला 45-37 असे नमवले. मुंबई पोस्टलने माझगाव डॉकचा 25-10 असा धुव्वा उडवत दमदार विजय नोंदवला. अभिषेक भोजनेच्या चढाया आणि ओमकार मोरेच्या पकडींनी प्रतिस्पर्ध्यांना निष्प्रभ केले.


























































