
ठाणे पालिकेच्या निवडणुकीतील जाहीर सभेत मुंब्रा हिरवा करण्याचे फुत्कार सोडणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांना शिंदे गटाने पायघड्या घातल्या आहेत. त्यांची कळवा-मुंब्रा केबल सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मुंब्यातील राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच हेच का शिंदे गटाचे हिंदुत्व, असा संतप्त सवालही ठाणेकरांनी केला आहे.
मुंब्यातील प्रभाग क्रमांक ३० मधून सहर शेख यांनी निवडणूक लढवली होती. त्यात त्या निवडूनही आल्या. प्रचारादरम्यान अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. निवडून आल्यानंतर त्यांनी विजयी सभेत केलेले भाषण सोशल मीडियावर चांगलेच गाजले होते. ‘कैसे हराया..’ असे म्हणत सहर शेख यांनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. याच सभेत त्यांनी संपूर्ण मुंब्रा आपण हिरवा करून टाकू, असेही वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून कमालीची टीका झाली.
भाषणात केली होती टीका
सहर यांचे वडील युनूस शेख यांनी आपल्या भाषणामध्ये शिंदे गटावरदेखील टीकेची झोड उठवली होती. आता शेख यांनाच शिंदे गटाने केबल सेनेचे अध्यक्ष केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली असून याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. युनूस शेख यांनी शिंदे गटात प्रवेश करतानाचा फोटोही समोर आला आहे. शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून केबल व इंटरनेट व्यवसायाशी संबंधित आहेत. आता तर त्यांची नियुक्ती शिंदे गटाने थेट केबल सेनेचे अध्यक्ष म्हणूनच केली आहे. त्यांच्या या नियुक्तीने राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.


























































