
‘मुघलशाहीच्या कारभाराला मागे टाकेल असा कारभार सध्या देशात सुरू आहे. अशा भ्रष्ट राजवटीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पदवीधर निवडणुकीत शिवसेनेने आपला स्वाभिमानी बाणा राखत स्वतंत्र उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या पोस्टरवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो प्रसिद्ध करून मत मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. मतदारांनी ही कुटिल नीती हाणून पाडत शिवसेनेचे उमेदवार सुनील मोदी यांना विजयी करून पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकवावा,’ असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी केले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ आज येथील मराठा समाज भवनात शिवसैनिक व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी विनायक राऊत बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते सुनील प्रभू, समन्वयक उद्धव कदम, संपर्कप्रमुख स्वप्नील कुंजीर-पाटील, शिवसेना उपनेत्या छायाताई शिंदे, सोलापूरच्या अस्मिता गायकवाड आणि उमेदवार सुनील मोदी उपस्थित होते.
यावेळी शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू यांनी सत्ताधारी भाजपच्या कारभारावर जोरदार आसूड ओढत शिवसेना सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष असल्याचे सांगितले. ‘दिल्लीतील जंतरमंतरवरील तरुणांच्या आंदोलनप्रसंगी आणि पुण्यातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत तरुणांना आधार दिला. पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेने खमक्या उमेदवार दिला आहे. सरकार पेपरफुटीसारखे अनेक प्रकार करत आहे. आता सरकारचे नशीब फुटायचे तेवढे बाकी आहे. ते फोडण्याचे काम शिवसैनिकांनी या पदवीधर निवडणुकीत करावे,’ असे आवाहन प्रभू यांनी केले.
केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार आसूड ओढत विनायक राऊत म्हणाले, ‘बनवाबनवी आणि फसवाफसवी करणाऱ्या या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सर्वशक्तीनिशी शिवसेना मैदानात उतरली आहे. पदवीधर निवडणूक ही त्याची सुरुवात आहे. आजच्या मेळाव्यात शिवसेनेच्या रणरागिणीही मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार सुनील मोदी हे अनुभवी आणि क्रियाशील उमेदवार आहेत. त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून विजयी करावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.
शिवसेनेचे उमेदवार सुनील मोदी यांनी आपली भूमिका मांडत पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी विजयी करण्याचा आवाहन केले.
सांगली जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी स्वागत केले. अभिजित पाटील यांनी आभार मानले. यावेळी सांगली जिल्हाप्रमुख विशालसिंग रजपूत, संजय काटे उपस्थित होते.


























































