
बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या आयपीओची औपचारिक घोषणा आज करण्यात आली. देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा असलेल्या या आयपीओच्या माध्यमातून 30,213 कोटी उभारण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. हा आयपीओ 21 ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 23 ऑक्टोबरपर्यंत त्यात गुंतवणूक करता येणार आहे. ‘जिओ’चे पुढचे लक्ष्य 6 जी तंत्रज्ञान असेल, असे संकेत पंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अंबानी यांनी यावेळी दिले.
नवी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत आकाश अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्म्सच्या भविष्यातील वाटचालीची माहिती दिली. ‘जिओची सध्याची नेटवर्क यंत्रणा आणि कंपनीने स्वतः विकसित केलेले तंत्रज्ञान भविष्यातील बदलांसाठी तयार आहे. देशवासीयांना तंत्रज्ञानाचा फायदा मिळावा आणि ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, हे जिओचे पहिले उद्दिष्ट आहे. 6 जी तंत्रज्ञान आणण्याची आमची योजना आहे. मात्र त्यासाठी नवीन टॉवर किंवा संपूर्ण नेटवर्क नव्याने उभारण्याऐवजी विद्यमान नेटवर्कमधील उपकरणे, सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान प्रणाली अद्ययावत करण्याचा आमचा प्रयत्न असेल,’ असे अंबानी यांनी सांगितले. कंपनीच्या संचालक ईशा अंबानी, सीईओ पंकज पवार व बँकर उदय कोटक हेही यावेळी उपस्थित होते.
आयपीओच्या माध्यमातून 27 कोटी नवे शेअर्स गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पंपनीने प्रति शेअर 1065 ते 1119 असा दरपट्टा निश्चित केला आहे. जिओ प्लॅटफॉर्म्स सूचीबद्ध झाल्यानंतर बाजारमूल्याच्या बाबतीत रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा समूह ठरणार आहे.
डिजिटल तंत्रज्ञानाच्या 7220 पेटंट्ससाठी अर्ज
तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनावर जिओचा भर असल्याचे आकाश अंबानी म्हणाले. कंपनीने नेटवर्क, उपकरणे, ऑपरेटिंग सिस्टम आणि डिजिटल ऑप्लिकेशन्समध्ये प्रचंड मोठे काम केले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित तब्बल 7220 पेटंट्ससाठी अर्ज केल्याचे त्यांनी सांगितले. मोबिलिटी, होम आणि एंटरप्राइज–इंटरनॅशनल या तीन क्षेत्रांवर पंपनीने लक्ष पेंद्रित केले आहे. प्रत्येक हिंदुस्थानी नागरिक, प्रत्येक घर आणि प्रत्येक उद्योगसमूहाला उत्तम आणि स्वस्त डिजिटल सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असेल. सध्या जिओकडे सुमारे 53.3 कोटी कनेक्टिव्हिटी ग्राहक असून देशातील 60 टक्क्यांहून अधिक डेटा वाहतूक जिओच्या नेटवर्कवरून होते, असे त्यांनी सांगितले. जिओचे सध्या सुमारे 2.86 कोटी फिक्स्ड ब्रॉडबँड ग्राहक असून ही संख्या 10 कोटी घरांपर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. देशातील सुमारे 65 टक्के बँक शाखा जिओच्या नेटवर्कशी जोडलेल्या आहेत, अशी माहिती आकाश अंबानी यांनी दिली.


























































