जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात भरधाव ट्रकच्या धडकेत कुटुंबच संपले! दुचाकीवर प्रवास करणाऱ्या 6 जणांचा मृत्यू, मृतांत 3 महिन्यांच्या चिमुकलीसह 2 लहान मुलांचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जळगाव जिल्ह्यात जामनेर-बोदवड रस्त्यावर गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिन्यांच्या चिमुकलीसह दोन लहान मुलांचा समावेश आहे.

मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील मजूर कुटुंब वाडी फाट्याजवळ पेट्रोलपंपावर दुचाकीत पेट्रोल भरून बाहेर पडत होते. त्याचवेळी समोरून भरधाव आलेल्या मालवाहू ट्रकने दुचाकीला उडवले. ही धडक एवढी जबरदस्त होती, की दुचाकीवरील सहाही जण हवेत उडून रस्त्यावर फेकले गेले. घटनास्थळावर सर्वत्र रक्तामांसाचा सडा पडला होता.

ट्रकच्या धडकेने संपूर्ण कुटुंबच संपवले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस येईपर्यंत स्थानिक ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले होते. अपघातातील सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

मालदाभाटी शिवारात मुख्य रस्त्यावर असलेल्या पेट्रोलपंपावर या कुटुंबाने दुचाकीत पेट्रोल भरले. पेट्रोल भरून पंपाच्या बाहेर रस्त्यावर येत असतानाच समोरून आलेल्या बेदरकार ट्रकने ही दुचाकी उडवली. धडकेचा आवाज ऐकून आजुबाजूचे लोक धावले. मात्र तोपर्यंत सहा जणांच्या जीवनाची अखेर झाली होती. रस्त्यावरचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. तीन महिन्यांची चिमुकली, दोन लहान मुलांचे मृतदेह पाहून अनेकांना हुंदका अनावर झाला. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, एकाच दुचाकीवर दोन पुरुषांसह एक महिला आणि तीन चिमुकले प्रवास करत होते. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.