आई अंबाबाई-त्र्यंबोली देवी भेटीचा सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी गुरुवारी (दि. १५) ललिता पंचमीनिमित्त टेंबलाई टेकडी येथे करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि श्री त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.

नवरात्रोत्सवाच्या पाचव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाई सखी श्री त्र्यंबोली देवीचा रुसवा घालवण्यासाठी स्वतः भेटीला जाते. यावेळी राक्षसाचा वध कसा केला हे कोहळा फोडून दाखविले जाते. आजही ही परंपरा जपली गेली आहे. त्यामुळे सकाळी परंपरेनुसार तोफेच्या सलामीनंतर शाही लवाजम्यासह देवी सोन्याच्या पालखीतून पश्चिमेकडे टेंबलाई टेकडीकडे प्रस्थान करते. सामाजिक न्याय क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दाखविलेल्या मार्गावरून ही पालखी निघते.

वाटेत पालखीच्या स्वागतासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या, तर पालखीसह मानकरी आणि भाविकांना प्रसादवाटप करून पालखीचे स्वागत करण्यात आले.

दरम्यान, टेंबलाई टेकडी येथे श्री त्र्यंबोली मंदिरात श्री अंबाबाई देवीची उत्सवमूर्ती आणि श्री त्र्यंबोली देवीची विधिवत भेट घडवण्यात आली. शिवाय परंपरेनुसार कुमारिकेच्या हस्ते कोहळारूपी राक्षसाचा वध करून कुष्मांड भेदन विधि पार पाडण्यात आला. यावर्षी हा मान नारायणी गुरुव या कुमारिकेला मिळाला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते कुमारिकेचे आणि देवीचे पूजन करून कुष्मांड विधि पार पडला. कोहळा फोडल्यानंतर कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली.