
कल्याण पूर्वेत मेट्रोचे काम सुरू असताना लोखंडी सळई दुचाकीस्वाराच्या डोक्यात पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत अब्दुल हक हे तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
अब्दुल हक हे मित्र हितांशू यांच्या दुचाकीवरून कल्याण पूर्वेतून उल्हासनगरच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली. डोक्यात लोखंडी तुकडा पडल्याने त्यांना गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांना प्रथम मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर पुढील उपचारांसाठी फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कोळसेवाडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.



























































