
नवरात्रोत्सवाच्या उत्साहात चंद्रपुरात गरब्याचा रंग चांगलाच रंगला आहे. खेल सेनेच्या वतीने शहरातील इंडस्ट्रियल मैदानावर माता अंबे भवानी नवरात्री गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 25 वर्षांपासून राजेश नायडू या गरबा महोत्सवाचे आयोजन करीत असून, यावर्षी ही स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. उत्सवाच्या पाचव्या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांनी गरब्यात उत्साहाने सहभाग घेतला. दररोज स्पर्धकांना विविध बक्षिसे देऊन त्यांचा उत्साह वाढवला जात आहे. या गरबा उत्सवात एका महिला स्पर्धकाने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तिच्या पाठीवर लिहिलेला महिलांच्या सन्मानाचा संदेश उपस्थितांना विचार करायला लावणारा ठरला. ‘रस्त्यावरून किंवा मैदानावरून चालणाऱ्या प्रत्येक मुलीकडे केवळ एक स्त्री म्हणून नव्हे, तर शक्तीचे रूप म्हणून पाहून तिला सन्मानाची नजर देऊया, असा आशय या संदेशातून मांडण्यात आला होता. या अनोख्या संदेशाने गरबा उत्सवाला सामाजिक जाणीवेची जोड दिली. एकीकडे पारंपरिक गरब्याचा उत्साह, तर दुसरीकडे महिलांच्या सन्मानाचा संदेश, यामुळे चंद्रपुरातील माता अंबे भवानी गरबा उत्सव आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.



























































