आयबीकडून पाळत, दिल्ली पोलीस अटक करण्याची शक्यता; दीपकेंचा दावा, तिरंगा फडकवण्यासाठी तुरुंगात जाण्याची तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी आपल्यावर गुप्तचर विभागाकडून (आयबी) पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला आहे. नंबरप्लेट नसलेल्या वाहनांमधून आपला पाठलाग केला जात असून घराबाहेरील सुरक्षारक्षकाकडे गुप्तचर विभागाचे कर्मचारी आपल्याबाबतची माहिती विचारत असल्याचा दावा दीपके यांनी केला. तसेच, पक्षाच्या नियोजित तिरंगा मार्चपूर्वी दिल्ली पोलीस आपल्याला ताब्यात घेण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. गुरुवारी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत दीपके यांनी हे आरोप केले.

तिरंगा फडकवण्यासाठी तुरुंगात जाण्याचीही आपली तयारी असल्याचे अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले. देशाचा तिरंगा फडकवणे हा गुन्हा असेल, तर त्यासाठी तुरुंगात जाण्यास आपण तयार आहोत, असे दीपके म्हणाले.

आम्ही शांततेत जाऊन तिरंगा फडकवणार आहोत. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. तिरंगा फडकवणे हा गुन्हा आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर देशद्रोही तुम्ही आहात, असे दीपके म्हणाले. या देशात तिरंगा फडकवण्यासाठी तुरुंगात जावे लागत असेल, तर आम्ही त्यासाठीही तयार आहोत, असेही दीपके त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, सीजेपीने शुक्रवारी नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. एसआयआर आणि निवडणूक आयोगातील भ्रष्टाचार तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राज्यानाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने आंदोलन पुकारले आहे. मात्र, या आंदोलनापूर्वीच प्रशासनाकडून कॅनॉट प्लेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.

जंतर मंतरवरील आंदोलनास बंदी का? कोर्टाचा सवाल

गुरुवारी नवी दिल्ली महानगरपालिकेने सेंट्रल पार्क 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी बंद राहणार असल्याची घोषणा केली. शुक्रवारी याच ठिकाणी तिरंगा मार्च आयोजित करण्यात येणार असल्याने या निर्णयावर अभिजीत दीपके यांनी प्रश्न उपस्थित केले. एखाद्या ठिकाणी तिरंगा फडकवण्याचा कार्यक्रम आयोजित केला म्हणून ते ठिकाण बंद केले जात असेल, तर आम्ही देशभरातील 100 ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले, तर प्रशासन सर्व 100 ठिकाणे बंद करणार का? असा सवाल त्यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत नागरिकांनी तिरंगा फडकवण्याचे ठरवले, तर ती सभाही रद्द केली जाणार का? असा सवाल त्यांनी केला.

13 कोटी नावे मतदार यादीतून का वगळली? सुप्रीम कोर्टाने उत्तर मागितले, इंडिया आघाडीच्या याचिकेवर निवडणूक आयोगाला नोटीस