
हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज संघात टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी दोन-दोन सामने जिंकले असून निर्णायक सामना 17 ऑक्टोबर रोजी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी हिंदुस्थानच्या संघात मोठा बदल करण्यात आला असून ‘स्विंगचा किंग’ भुवनेश्वर कुमार याने कमबॅक केले आहे.
भुवनेश्वर कुमार याने जवळपास 4 वर्षानंतर संघात कमबॅक केले आहे. अर्शदीप सिंग याला चौथ्या टी-20 सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो पाचव्या टी-20 सामन्याला मुकण्याची शक्यता असून त्याच्या जागी भुवनेश्वरला संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे भुवनेश्वरला घरच्या मैदानावर आपल्या स्विंगची जादू दाखवण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने शुक्रवारी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
🚨 News 🚨
Arshdeep Singh sustains blow to bowling shoulder; Bhuvneshwar Kumar added to #TeamIndia’s squad for the Bengaluru T20I.
More Details ▶️ https://t.co/i18NeqDLrU
#INDvWI | @mflone_
— BCCI (@BCCI) October 16, 2026
बुधवारी हैदराबादविरुद्ध झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या जागी भुवनेश्वर कुमारला संघात स्थान देण्यात आले आहे. अखेरच्या टी-20 सामन्यात अर्शदीप खेळणार की नाही याचा निर्णय सामन्यापूर्वी घेतला जाईल, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिली.
भुवनेश्वर कुमार याने नोव्हेंबर 2022 मध्ये आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याला संघातून डच्चू देण्यात आला होता. मात्र इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसला. तो संघात असताना आरसीबीने आयपीएलचा चषकही उंचावला. 36 व्या वर्षीही त्याची कामगिरी उजवी राहिल्याने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठीही त्याची निवड झाली होती. मात्र आता त्या मालिकेपूर्वीच त्याला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता असून वेस्ट इंडिजविरुद्ध बंगळुरूमध्ये होणाऱ्या अखेरच्या टी-20 सामन्यासाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

























































