हातचलाखी आणि सावकारी सरकारला शोभते का? शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांच्या मदतीवरून रोहित पवार यांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या तीव्र छायेत होरपळत असून बळीराजा हवालदिल झाला आहे. एकीकडे खतांचे वाढलेले भाव आणि दुसरीकडे निसर्गाची अवकृपा अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला असताना, राज्य सरकारकडून जाहीर झालेली मदत अत्यंत तोकडी असल्याची टीका होत आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी किमान एक लाख रुपयांची मदत मिळणे अपेक्षित असताना सरकार केवळ पाच हजार रुपये देत आहे. ही हातचलाखी आणि सावकारी सरकारला शोभते का? असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली, त्यात त्यांनी म्हटले की, एका हाताने पाच हजार रुपयांची मदत दाखवायची आणि दुसऱ्या हाताने कृषी सन्मान निधीचे चार हजार रुपये रोखून धरायचे, ही केवळ धूळफेक आणि हातचलाखी असून ही कसली सावकारी वृत्ती सरकारला शोभते का? असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकारावरून सरकारची असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघड झाली असून, शेतकऱ्यांना मदत देताना सरकार जर अशी पाकीटमारी करत असेल आणि हात आखडता घेत असेल, तर या सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.