
दिल्लीत सीजेपीकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने सुरू आहेत. यावेळी जंतरमंतरवर तिंरगा फडकवून आंदोलन करणाऱ्या सीजेपीच्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तिरंगा फडकवणाऱ्यांना विरोध करणारे ब्रिटिशांचे वंशज आणि ब्रिटिशभक्त असल्याची घणाघाची टीका संजय राऊत यांनी केली.
तिरंगा हा आमचा सन्मान, राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, तिरंगा फडकवणं हा गुन्हा 1947 नंतर आरएसएसने मानला होता. त्यांनी त्यांच्या कार्यालयावर 40 ते 45 वर्षे तिरंगा फडकवला नाही. त्यांच्या दृष्टीने तिरंगा फडकवणे हा गुन्हा होता. आमच्या दृष्टीने तिरंगा फडकवणे हा सन्मान, राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. सार्वजनिक ठिकाणी सीजेपीच्या लोकांनी तिरंगा फडकवून आंदोलन केलं असेल तर अमित शहांना आणि त्यांच्या पोलिसांना राग येण्याचं चिडायचं कारण काय? तुम्ही कोणत्या भूमिकेत वावरताय. हा तिरंग्याचा अपमान आहे. उद्या जंतरमंतरवर जाऊन मी वंदे मातरम् म्हणेन म्हणून मला अटक करणार का? अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारला सुनावले.
जनं गणं मनं, वंदे मातरम् आणि तिरंगा हे राष्ट्राभिमानाचे प्रतीक आहेत. एकीकडे वंदे मातरम् संपूर्ण म्हटलं पाहिजे सांगता आणि दुसरीकडे तिरंगा फडकवणाऱ्याला अटक करता. आम्ही सगळे उतरू तिरंगा फडकवायला. करा आम्हाला पण अटक. अजून किती लोकांना अटक करणार? आत्तासारखी परिस्थिती ब्रिटिशांच्या काळात निर्माण झाली होती. हे सगळे ब्रिटिशाांचे वंशज असल्यामुळे, ब्रिटीशभक्त असल्यामुळे ते आम्हला तिरंगा फडकवायला विरोध करतायत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.


























































