डोंगराळे अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा, फास्ट ट्रॅक कोर्टाचा 11 महिन्यात निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही घटना अकरा महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणी आता मालेगाव फास्ट ट्रॅक कोर्टाने आज निकाल दिला असून चिमुकलीचे लचके तोडणारा नराधम विजय खैरनार (वय – 24) याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 16 नोव्हेंबर 2025 रोजी तीनवर्षीय बालिकेचे अपहरण करण्यात आले. विजय खैरनार याने चॉकलेटचे आमिष दाखवून बालिकेचे अपहरण केले आणि त्यानंतर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली होती. या प्रकरणी विजय खैरनार याला मालेगाव पोलिसांनी अटक केली होती. नराधम विजय खैरनार याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तीन आठवड्यांच्या आता चार्जशीट दाखल केली होती. गेल्या अकरा महिन्यांपासून या खटल्याची सुनावणी सुरू होती. 24 साक्षीदारांच्या तपासणीनंतर आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते आणि शुक्रवारी त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी पीडितेची बाजू मांडली.

विजय खैरनार याला यापूर्वीच दोषी ठरवण्यात आले होते. मात्र जन्मठेप की फाशी द्यायची असा प्रश्न न्यायालयापुढे होता. आरोपी 24 वर्षांला असला तरी आपण केलेल्या कृत्याच्या परिणामांची जाणीव त्याला होती. आजही तो व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर होता. त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे भाव नव्हते. तुरुंग अधिकारी, प्रोबेशन अधिकारी आणि मानसोपचार तज्ज्ञांचे रिपोर्टवरून हे स्पष्ट होत होते की याला कमी शिक्षा दिली तर हा सुधारू शकत नाही, उलट समाजाला घात होऊ शकतो. म्हणून न्यायालयाने दोन्ही बाजूंचा विचार करून फाशीची शिक्षा सुनावली. 30 दिवसांच्या आत त्याला यावर अपील करण्याची मुभा आहे. त्यानंतर उच्च न्यायालयात हे प्रकरण चालले जाईल आणि तिथेही शिक्कामोर्तब झाल्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू होईल, अशी माहिती अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली.