
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी बोनसची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी पात्र कर्मचाऱ्यांना ३० दिवसांच्या वेतनाइतका अॅड-हॉक बोनस देण्यास वित्त मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश १५ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला. या निर्णयामुळे पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना कमाल ६,९०८ रुपयांचा बोनस मिळू शकतो.
बोनसची गणना कर्मचाऱ्याच्या सरासरी मासिक वेतनाच्या आधारे केली जाणार आहे. यासाठी मासिक वेतनाची कमाल मर्यादा ७,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचे सरासरी मासिक मूलभूत वेतन ७,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असले, तरी बोनसची गणना ७,००० रुपयांच्या मर्यादेनुसारच केली जाईल.
हा बोनस सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरसकट लागू नसून, निर्धारित पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागाने जारी केलेले आदेश आणि बोनससंबंधी नियम तपासणे आवश्यक आहे.

























































