रिजनल स्पोर्ट्स बोर्डची तिसऱ्या फेरीत धडक, माटुंगा वर्कशॉपचा पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिजनल स्पोर्ट्स बोर्डाने माटुंगा वर्कशॉपचा ४२-१० असा धुव्वा उडवत शिवनेरी सेवा मंडळ, दादर आयोजित शिवनेरी कबड्डी महोत्सवाच्या व्यावसायिक गटात तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. अजिंक्य कापरेच्या आक्रमक चढाया आणि साई केरूडच्या भक्कम पकडीने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पुढील फेरीत रिजनल स्पोर्ट्स बोर्डाचा सामना बीपीटीशी होईल.

दुसऱ्या फेरीत बीपीटीने मुंबई पोलिसांचा ४५-२० असा पराभव केला. अनुराग सिंग आणि रूपेश साळुंखे यांनी अनुक्रमे चढाई व पकडीत प्रभावी कामगिरी केली. पश्चिम रेल्वेने नेस्टजेन ॲकॅडमीला ५३-३३ असे नमवले, तर सेंट्रल रेल्वेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर ३४-२० अशी मात केली.

कुमार गटात अमर क्रीडा मंडळाने श्रीराम क्रीडा मंडळाचा ५३-३३ असा, तर विजय क्लबने नवोदित क्रीडा मंडळाचा ३७-२८ असा पराभव केला.

महिला गटात विवेक महिला संघाने जिजामाता महिला संघाचा ४२-७ असा धुव्वा उडवला. डॉ. शिरोडकर संघाने स्वामी समर्थ महिला संघावर ४५-२५ असा विजय मिळवला. या सामन्यांमुळे स्पर्धेतील चुरस वाढली असून, खेळाडूंच्या आक्रमक चढाया आणि अचूक पकडींनी कबड्डीप्रेमींना रंगतदार खेळाची मेजवानी दिली.