ठसा – डॉ. नरेंद्र पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत देशाच्या उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रांतील संधींना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेले डॉ. नरेंद्र पाटील यांची अमेरिकेत होणाऱ्या ‘G20’अंतर्गत ‘बिझिनेस -20’ परिषदेसाठी सलग चौथ्यांदा निवड झाली आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय कार्याची दखल घेत त्यांना पुन्हा एकदा या महत्त्वपूर्ण जागतिक व्यासपीठावर सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. भारतामध्ये झालेल्या G20 परिषदेपासून सुरू झालेला त्यांचा हा आंतरराष्ट्रीय प्रवास ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या संबंधित परिषदांमधील सहभागानंतर आता अमेरिकेत होणाऱ्या परिषदेतही सुरू राहणार आहे. या माध्यमातून भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

‘G20’ हा जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचा महत्त्वपूर्ण गट असून ‘बिझनेस 20’ हे ‘G20’ प्रक्रियेशी संबंधित जागतिक व्यावसायिक व्यासपीठ आहे. उद्योग, व्यापार, आर्थिक विकास, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य या विषयांवर उद्योग जगताच्या सूचना आणि दृष्टिकोन मांडण्यासाठी ‘B20’ महत्त्वाची भूमिका बजावते.

डॉ. नरेंद्र पाटील हे भारत आणि ब्राझील यांच्यातील व्यापार, उद्योग आणि गुंतवणूक संबंध दृढ करण्यासाठी कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सहकार्य, परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे आणि भारतीय उद्योगांसाठी जागतिक बाजारपेठांमध्ये नवीन संधी निर्माण करणे या क्षेत्रांवर त्यांचा विशेष भर आहे. भारत, ब्राझील, अमेरिका आणि इतर देशांतील व्यावसायिक संस्था, गुंतवणूकदार आणि उद्योग प्रतिनिधींशी समन्वय साधून द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

अमेरिकेत होणाऱया आगामी ‘बी-20’ परिषदेत भारतातील उद्योग जगताच्या संधी, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक, व्यापारवृद्धी आणि भारत-ब्राझीलसह विविध देशांमधील आर्थिक सहकार्य या विषयांना चालना देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः महाराष्ट्रातील उद्योग, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स, संरक्षण क्षेत्र, आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय भागीदारी विकसित करण्याच्या दृष्टीने अशा जागतिक व्यासपीठांचे महत्त्व अधिक आहे.

भारतामध्ये झालेल्या ‘G20’ परिषदेपासून ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि आता अमेरिका अशा सलग चार टप्प्यांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही डॉ. नरेंद्र पाटील यांच्यासाठी महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे. त्यांच्या या निवडीमुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संबंधांना बळकटी देण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भारताचे जागतिक व्यासपीठावरील प्रतिनिधित्व अधिक प्रभावी करणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून देशाच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना देणे, हे या सहभागाचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट ठरणार आहे.

प्रतिनिधी