मुंबईतही पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त, आझाद मैदानात जेन-झींचे आंदोलन; वकिलांची न्यायालयाबाहेर निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भ्रष्ट निवडणूक आयोग आणि घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात आंदोलनाचे रण पेटले असताना मुंबईतील आझाद मैदानात जेन-झींनी आज जोरदार तिरंगा आंदोलन केले. तर वकिलांनीही न्यायालयाबाहेर निदर्शने करून सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. जेन-झींच्या आंदोलनाचा धसका घेतलेल्या पोलिसांनी संपूर्ण मुंबईत प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. तर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर याआधी झालेल्या आंदोलकांच्या उद्रेकाचा धसका घेतलेल्या पोलिसांनी शिवाजी पार्कवरदेखील बंदोबस्त ठेवला होता.

सीजेपीचे आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या सुटकेसाठी आझाद मैदानावर ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी मुंबई शहरासह उपनगरांतील संविधानप्रेमी तरुण-तरुणींनी सकाळपासूनच आझाद मैदान गाठले. सीजेपीने पोलिसांची पूर्वपरवानगी घेऊन हे आंदोलन पुकारले होते. यावेळी सीजेपीच्या प्रतिनिधींबरोबरच ‘भवन सिंग जन अधिकार यात्रा’ आणि ‘ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन’ यांसारख्या संघटनांचे स्वयंसेवक आंदोलनात सहभागी झाले. ‘शरम करो, शरम करो, दिल्ली पोलीस और मुंबई पोलीस शरम करो’ अशा घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला.

ईव्हीएमवर बंदी घाला, एसआयआर रद्द करा!

आंदोलकांनी भ्रष्ट निवडणूक पद्धतीचा निषेध नोंदवणारे फलक झळकावले. ‘निवडणुका मतपत्रिकेद्वारेच घेतल्या जाव्यात’, ‘ईव्हीएमवर बंदी घाला’, ‘एसआयआर रद्द करा’, ‘ज्ञानेश कुमार यांना अटक करा’, ‘मोदी को जितवाने ज्ञानू चोर आया है’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. दुपारनंतर उन्हाचा तडाखा वाढला. मात्र उन्हाचे चटके सहन करीत आंदोलकांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक आयोग आणि भाजप सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली आणि संविधान रक्षणासाठी निवडणूक आयोगाविरोधातील लढय़ाला पाठिंबा दिला.