विद्यापीठाच्या युवक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा, जीवनातील प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घ्या-अभिनेते भारत गणेशपुरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांनी जीवनातील प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घ्यावा, आपल्या खांद्यावर संपूर्ण जगाचे ओझे आहे अशा अविर्भावात कधीही वागू नये, आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या, मनमोकळेपणाने जगा, मजा करा आणि सदैव आनंदी राहा, असा सल्ला अभिनेते भारत गणेशपुरे यांनी दिला.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ज्ञानतीर्थ २०२६ च्या उद्घाटन समारंभात उद्घाटक म्हणून गणेशपुरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.मनोहर चासकर हे होते. आज साने गुरुजी मंचावर या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, ‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. संतराम मुंडे, डॉ. डी.एन. मोरे, डॉ. सुरेखा भोसले, डॉ. हनुमंत कंधारकर, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, संस्थेचे सहसचिव अ‍ॅड. प्रदीप नागापूरकर आदी उपस्थित होते.
पुज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतीमेचे पुजन करून दीप प्रज्वलानाने कार्यक्रम प्रारंभ झाला. अत्यंत साध्या पध्दतीने उदृघाटन समारंभ संपन्न झाला. यामध्ये तीन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला, इतरांचे शब्दसुमनांने स्वागत करण्यात आले.

कुलगुरू डॉ. चासकर पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही शैक्षणिक संस्थांची महत्त्वाची जबाबदारी आहे. युवक महोत्सवातून विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची, आत्मविश्वास वाढविण्याची आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची संधी मिळते, अशा भावना व्यक्त केल्या.

जीवनातील प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घ्या – अभिनेते भारत गणेशपुरे
यावेळी प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी आपल्या खास विनोदी आणि मिश्कील शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी जीवनातील प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घ्यावा. आपल्या खांद्यावर संपूर्ण जगाचे ओझे आहे, अशा आविर्भावात कधीही वागू नये. या भूतलावर कोणामुळे कोणाचे काहीही अडून राहत नाही. त्यामुळे आपल्यामुळेच सर्व काही चालते किंवा आपल्याशिवाय काहीच होणार नाही, असा गैरसमज मनात बाळगू नका. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या, मनमोकळेपणाने जगा, मजा करा आणि सदैव आनंदी राहा.’’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रध्दा साळवे आणि प्रा. बालाजी भंडारे यांनी केले. १६ ते १९ ऑक्टोबरपर्यंत चालणार्‍या या युवक महोत्सवात विद्यापीठ क्षेत्रातील ११० महाविद्यालयातील ११०० विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत.