
कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजित दिपके यांना दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. ‘लहरा दो तिरंगा’ मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी ते घरातून बाहेर पडले होते. मात्र, कनॉट प्लेस येथे जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना रोखले. आपण अद्याप कनॉट प्लेसला जातही नसताना आपल्याला का अडवले जात आहे, असा सवाल दिपके यांनी केला. ताब्यात घेण्यापूर्वी ते वारंवार ‘मी काय केले?’ असे विचारत होते.
दिपके यांनी सांगितले की, आपण एकटेच असून एकट्यानेच जात आहोत. तरीही आपल्याला का रोखले जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आंदोलन करण्यासाठी आपण नेमके कुठे जाणार, असा सवालही त्यांनी पोलिसांना वारंवार विचारला.
दिल्ली पोलिसांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिपके यांना खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी शुक्रवारी सकाळीच त्यांना दिल्ली पोलीस कायद्यांतर्गत नोटीस दिली होती. मात्र, त्यानंतरही दिपके सेंट्रल पार्कमध्ये जाण्यावर ठाम होते.
यापूर्वीही दिल्ली विमानतळावर घेतले होते ताब्यात
यापूर्वीही दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपके यांना दिल्ली विमानतळावरून ताब्यात घेतले होते. त्या वेळी त्यांच्याकडून शांतता राखण्यासंदर्भातील बाँड घेण्यात आला होता. न्यायालयाने त्यांची ५० हजार रुपयांच्या शांतता बाँडवर सुटका केली होती. तसेच, पुढील एक वर्ष कोणताही अशांतता निर्माण करणारा प्रकार करणार नसल्याच्या अटीवर त्यांच्याकडून बाँडवर स्वाक्षरी करून घेण्यात आली होती.
CJP कडून तिरंगा मार्च सुरू ठेवण्याची घोषणा
अभिजित दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतरही त्यांच्या पक्षाने तिरंगा मार्च सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. पक्षाने समर्थकांना पाचपेक्षा कमी लोकांच्या गटात कनॉट प्लेस येथे पोहोचण्याचे आवाहन केले आहे. तेथे राष्ट्रीय ध्वज फडकवावा, त्यासोबत छायाचित्र काढावे आणि त्यानंतर तेथून निघून जावे, असे पक्षाने आपल्या समर्थकांना सांगितले आहे.
‘तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही’, असा संदेश CJP ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर LeharaDoTiranga या हॅशटॅगसह दिला आहे.



























































