
नांदेडहून सावरगाव वाडीकडे परतत असताना 15 ऑक्टोबरच्या मध्यरात्री बहादरपुरा येथील मन्याड नदीच्या पुलावर एक दुर्दैवी अपघात घडला. रात्रीच्या वेळी कारवरील ताबा सुटल्याने ही कार कठडा नसलेल्या पुलावरून थेट मन्याड नदीत कोसळली. या भीषण अपघातात पाण्यात बुडून पार्वतीबाई लक्ष्मण गुटे (वय 42) या जागीच ठार झाल्या, तर पती लक्ष्मण गुटे यांना पोहता येत असल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला. या दुर्घटनेमुळे सावरगाव वाडीसह परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
हा बहादरपुरा पूल जुना झाल्याने आणि त्याची कार्यमर्यादा संपल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रशासनाकडून दोन्ही बाजूंना बॅरिकेट्स व मातीचे ढिगारे टाकून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. मात्र, परिसरातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी काहींनी हा रस्ता मोकळा करून घेतला असला तरी शासकीय कागदपत्री तो अजूनही बंदच आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पुलाचे दोन्ही संरक्षक कठडे तुटले होते आणि काही चोरट्यांनी ते चोरून नेले होते. रात्रीच्या वेळी नवीन वाहनधारकांना हा रस्ता मोकळा दिसल्यामुळे ते सहजतेने येथून प्रवास करतात, याच अंधारात हा मोठा अपघात घडला.
घटना घडली तेव्हा रात्रीच्या गडद अंधारात लक्ष्मण गुटे कसेतरी पोहत नदीबाहेर आले आणि त्यांनी तातडीने कंधार पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ग्रामीण रुग्णालयात मदत पोहोचवली. भोई समाज व स्थानिक पोहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने कार शोधून पार्वतीबाई यांना बाहेर काढण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने नदीतून कार बाहेर काढली असून, पोलीस उपअधीक्षक सुशील जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




























































