गोदावरी नदीपात्रात रेती उपसा करणार्‍याविरुध्द धाडसी कारवाई, २.२९ कोटीचे साहित्य जप्त व नष्ट, ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

-नांदेड पोलिसांनी अवैध रेती उपसा करणार्‍याविरुध्द जोरदार मोहिम हाती घेतली असून, आज दुपारी वाहेगाव शिवारात गोदावरी पात्रात स्थानिक गुन्हा शाखा आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवैध रेती उपसा करणारे २.२९ कोटी रुपयांचे साहित्य जप्त व नष्ट केले. या धाडसी कारवाईत ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार  त्यांनी स्थानिक गुन्हा शाखा आणि ग्रामीण पोलिसांना सतर्क करुन वाहेगाव शिवारात संपूर्ण टिमसह पाठविले. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या इंजिनव्दारे व बोटीव्दारे अवैध रेतीचा उपसा केला जात होता. पोलिसांनी पाच मोठ्या लोखंडी बोटी जागेवरच नष्ट केल्या. तीन छोट्या बोटी व रेती उपसा करणारे तीन इंजिन जिलेटीनचा स्फोट करुन त्या नष्ट करण्यात आल्या. पाण्यात तरंगणारे ३७ तराफे आणि ७४ ब्रास रेती पोलिसांनी जप्त केली असून, नष्ट केलेला व जप्त केलेला मुद्देमाल २.२९ कोटी रुपयांचा आहे.

पोलिसांनी याठिकाणाहुन ११ आरोपींना अटक केली आहे. यात अल्लाउद्दीन शेख दुखू शेख रा.झारखंड, खदीर शेख जल्लू शेख रा.झारखंड, अब्दुल वाहेद मुरुद्दीन शेख रा.झारखंड, अखिलेशकुमार धरमदेव राम रा.बिहार, उमेशकुमार धरमदेव राम रा.भागत ता.सिसवान (बिहार), शैलेशकुमार धरमदेव राम, सुनिलकुमार हरदत्त राम, मधुकर कळके, पवन मोरे, बालाजी कळके यांचा समावेश आहे. या सर्वाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अतुल भोसले व पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या अधिपत्याखाली सदरची कारवाई करण्यात आली आहे.