निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कटकारस्थान सुरू, अखिलेश यादव यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजवादी पक्षाचे (SP) प्रमुख अखिलेश यादव यांनी शुक्रवारी सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. राजकीय विरोधकांना थेट निवडणुकीत विजय मिळवता येणार नाही, याची जाणीव असल्याने ते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कटकारस्थाने रचत असल्याचा आरोप यादव यांनी केला. लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मतदार यादीच्या वारंवार होणाऱ्या फेरतपासणीवरही अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोगाने वारंवार मतदार यादीत बदल करण्याऐवजी एकदाच फेरतपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. एसएसआरबाबत (SSR) निर्णय घेतला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारीही करण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत हीच प्रक्रिया कायम ठेवावी, असे ते म्हणाले.

भाजपवर टीका करताना यादव म्हणाले की, अनेक लोक आता भाजपसोबत राहू इच्छित नाहीत. सरकारची कोणतीही योजना यशस्वी होत नसल्याने आता एसएसआरचा आधार घेतला जात आहे. एसएसआरची उलटापालट केली, तर त्यातून आरएसएस (RSS) तयार होते, असा शब्दांचा खेळ करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

मतदार यादीतील त्रुटींचा मुद्दाही अखिलेश यादव यांनी उपस्थित केला. विविध मतदारसंघांमध्ये एकाच मतदाराची नावे दोनदा किंवा अनेकदा नोंदवली गेल्याचा दावा त्यांनी केला. मतदार यादीत अशा प्रकारच्या नोंदी असल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सूचित केले.

यादव यांनी विरोधकांवर टीका करताना त्यांना अराजकवादी आणि नकारात्मक विचारांचे लोक असे संबोधले. थेट निवडणुकीत सामना करणे शक्य नसल्याने हे लोक निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मोठे कटकारस्थान रचत असून त्यांचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

मतदार यादीत फेरफार करण्याचे कोणतेही प्रयत्न हाणून पाडण्यासाठी समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक प्रत्येक स्तरावर सतर्क राहतील, असेही अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून मतदार यादीतील संभाव्य अनियमिततांना विरोध केला जाईल, असे त्यांनी सांगितले.