‘तिरंगा फडकवणे गुन्हा आहे का?’ अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी केजरीवाल संतापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या कारवाईचा आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निषेध केला आहे. पोलिसांची ही कारवाई म्हणजे हुकूमशाही असल्याची टीका करत त्यांनी, तिरंगा फडकवणे हा गुन्हा आहे का, असा सवाल उपस्थित केला. आपण आपल्या देशात तिरंगा फडकवणार नाही, तर पाकिस्तानात फडकवणार का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. ज्यांना भारतीय तिरंग्याचा त्रास होतो, त्यांनी पाकिस्तानात जावे, असे केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी पंतप्रधान मोदी त्यांना किती घाबरतात, हे दिसून येते, असा दावा त्यांनी केला.

तिरंगा फडकवण्यासाठी जात असताना दीपके यांना ताब्यात घेतले

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दीपके हे ‘लहरा दो तिरंगा’ या कार्यक्रमासाठी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

दीपके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्याच्या निवासस्थानी होते. तेथून बाहेर पडताच परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी दीपके आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना गाडीत बसवून ताब्यात घेतले.

‘आरएसएस आणि भाजपला भारत माता की जयच्या घोषणेचा त्रास’

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनीही या कारवाईवरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) जोरदार टीका केली. आरएसएस आणि भाजपला ‘भारत माता की जय’ या घोषणेचा तसेच तिरंग्याचा त्रास होतो, असा आरोप त्यांनी केला.

संजय सिंह म्हणाले, “आरएसएस आणि भाजपने नागपूर येथील मुख्यालयावर 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही. राष्ट्रगीताबाबतही त्यांनी ते मनोरंजनाचा एक प्रकार असल्याचे लिहिले होते. तसेच हे तेच लोक आहेत, ज्यांनी जिना यांच्या कबरीवर जाऊन नतमस्तक होण्याचे काम केले.”

‘पंतप्रधान मोदी ब्रिटिश राजवटीच्या पुनरागमनाचे उदाहरण देत आहेत’

संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना सध्याच्या परिस्थितीची तुलना ब्रिटिश राजवटीशी केली. पंतप्रधान मोदी ब्रिटिश राजवट पुन्हा येत असल्याचे उदाहरण देशासमोर ठेवत आहेत, असे ते म्हणाले.

अभिजीत दीपके, नेहा बोरा आणि इतरांना ज्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आले, त्याचा आम आदमी पक्ष निषेध करतो, असेही त्यांनी सांगितले.

“तिरंग्याला विरोध करणारे इंग्रज या देशात टिकू शकले नाहीत. ‘भारत माता की जय’ या घोषणेला विरोध करणाऱ्या इंग्रजांची राजवटही या देशात चालली नाही. त्याचप्रमाणे तुमची राजवटही चालणार नाही. तुम्हालाही सत्तेतून जावे लागेल,” अशा शब्दांत संजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.