
अनियंत्रित बस खड्ड्यात कोसळून भीषण अपघाताची घटना राजस्थानमधील कोटा येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर घडली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, ही बस भोपाळहून खाटूश्यामला जात होती. बसमध्ये 21 प्रवासी होते. प्रवाशांमध्ये वृद्ध आणि लहान मुलांचाही समावेश आहे. राजस्थानमधील कोटा येथे बस अनियंत्रित झाली आणि खड्ड्यात कोसळली. जिल्हाधिकारी पियुष सामरिया आणि कोटा परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक हरेंद्र महावर यांनी एमबीएस रुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

























































