
राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी गठीत निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीत पाच नव्या अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात आला असून सांस्कृतिक कार्य विभागाने आज यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.
मुख्यमंत्री अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असलेल्या या समितीत सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री, या विभागाचे राज्यमंत्री आणि विभागाचे सचिव यांचा समावेश आहे, तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
या समितीत अशासकीय सदस्य म्हणून प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, क्रीडापटू अंजली भागवत, अभिनेते अशोक सराफ आणि उद्योजक दिलीप दांडेकर यांचा समावेश आहे. ही समिती शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा समितीची पुनर्रचना होणे यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत कार्यरत असेल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.


























































