हिंदुस्थानचा झिम्बाब्वेवर दमदार विजय; दीप्ती शर्मा आणि निकी प्रसाद यांनी सामना फिरवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पदार्पण करणारी निक्की प्रसाद आणि दीप्ती शर्मा यांच्या दमदार भागीदारीमुळे हिंदुस्थानला झिम्बाब्वेवर दमदार विजय साकारता आला. झिम्बाब्वेच्या संघाला 114 धावांत रोखण्यात हिंदुस्थानला यश आले होते; पण 115 धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानची 4 बाद 19 अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर दीप्ती आणि निकी यांनी पाचव्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी रचल्यामुळे हिंदुस्थानला 4 विकेट्स आणि 26 चेंडू राखत दमदार विजय साकारता आला.

प्रथम फलंदाजी करणाऱया झिम्बाब्वेला क्रांती गौडने पहिल्याच षटकात धक्का दिला, पण त्यानंतर केलिस नडोलव्हूने सात चौकारांच्या जोरावर 42 धावा करत संघाला सावरले. त्यानंतर शेर्न मेयर्सने 33 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 43 धावांची खेळी साकारली आणि संघाला 114 धावांपर्यंत मजल मारून दिली. हिंदुस्थानकडून नंदिनी शर्माने फक्त 11 धावांत दोन विकेट्स मिळवल्या.

झिम्बाब्वेच्या 115 धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात वाईट झाली. स्मृती मानधना 9, शेफाली शर्मा 4, हरमनप्रीत कौर 1 आणि अनुष्का शर्मा 4 धावांवर बाद झाल्या आणि संघाची धावसंख्या फक्त 19 झाली होती. त्यावेळी हिंदुस्थानचा संघ अडचणीत आला होता. पण त्यानंतर दीप्ती शर्माने 37 चेंडूंत आठ चौकारांच्या जोरावर 49 धावांची दमदार खेळी साकारत संघाला विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास मदत केली. दीप्तीला निकीने 35 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने नाबाद 39 धावा करत सुयोग्य साथ दिली.