स्टारलिंकचे स्वागत, मात्र नियमांचे पालन सर्वांनाच करावे लागेल; रिलायन्स इंडस्ट्रीजचे इलॉन मस्क यांना उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ या सॅटेलाईट इंटरनेट सेवेला हिंदुस्थानात रोखण्याच्या आरोपांना रिलायन्स इंडस्ट्रीजने उत्तर दिले आहे. आम्ही कोणत्याही स्पर्धेला घाबरत नाही. सर्वोत्तम सेवा कोण देतो हे ज्यातून कळेल, तीच खरी स्पर्धा आहे. सरकारचे नियम सर्वांसाठी एकसमान आहेत. जियो सॅटेलाईटलादेखील अद्याप सरकारकडून पूर्ण मंजुरी मिळालेली नाही, असे म्हणत रिलायन्स इंडस्ट्रीजने मस्क यांचे आरोप फेटाळून लावले.

स्टारलिंकला हिंदुस्थानात सेवा सुरू करण्यात होत असलेल्या विलंबावरून मस्क यांनी काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त करत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यावर आरोप केले होते. यासंदर्भात रिलायन्स इंडस्ट्रीजने आज ‘एक्स’वर पोस्ट करुन मस्क यांना प्रत्युत्तर दिले. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सरकारचे नियम सर्वांसाठी सारखे आहेत. जियो सॅटेलाईटलादेखील अद्याप पूर्णपणे परवानगी मिळालेली नाही. आम्ही स्टारलिंकसारख्या नव्या कंपन्यांचे स्वागत करतो. स्टारलिंक असो किंवा जियो, प्रत्येक कंपनीला हिंदुस्थानच्या कायद्यांचे पालन करावेच लागेल, असे रिलायन्स इंडस्ट्रीजने स्पष्ट केले आहे.