
वेस्ट इंडीजने दमदार पुनरागमन केल्याने आता टी-20 मालिकेचा निकाल पाचव्या सामन्यात लागणार आहे. हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांची 2-2 अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे जो हा सामना जिंकेल त्यांना मालिका विजय मिळवता येईल. त्यामुळे आता पाचवा सामना म्हणजे दोन्ही संघांसाठी आरपारची लढाई असणार आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवत कोणता संघ मालिका जिंकतो, याची उत्सुकता सर्वांना असेल.
शाई होपचे शतक आणि हिंदुस्थानी फलंदाजांच्या हाराकिरीमुळे हिंदुस्थानवर चौथ्या टी-20 सामन्यात पराभवाची नामुष्की ओढवली आहे. होप हा हिंदुस्थानच्या संघासाठी कर्दनकाळ ठरताना दिसत आहे. त्यामुळे त्याला लवकर बाद केले तरच हिंदुस्थानच्या संघासाठी विजयाचे दार उघडू शकते. फक्त होप नाही तर शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफन रदरफोर्ड आणि रोमॅरियो शेफर्ड यांच्यासारखी धडाकेबाज फलंदाजांची फळी त्यांच्याकडे आहे. वेगवान गोलंदाज किमो पॉल हा भन्नाट फॉर्मात आहे. गुडाकेश मोती आणि रोस्टर चेस सातत्यपूर्व दमदार कामगिरी करत आहेत. एकंदरीत वेस्ट इंडीजचा संघ भन्नाट फॉर्मात आहे.
हिंदुस्थानची गोलंदाजी आणि फलंदाजी यांच्याच सातत्य आणि लय दिसत नाही. अभिषेक शर्मा तर गेल्या सामन्यात कसोटीची फलंदाजी करताना दिसला होता. संजू सॅमसन चांगल्या फॉर्मात असला तरी त्याला चांगली साथ मिळताना दिसत नाही. ईशान किशन, श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा यांच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. नमन धीर आणि नितीश कुमार रेड्डी यांना अष्टपैलू कामगिरी करता आलेली नाही. हिंदुस्थानचा एकही गोलंदाज लयीत दिसत नाही. पण संघात आता भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले असल्यामुळे गोलंदाजीत किती सुधारणा होते याकडे सर्वांचे लक्ष असेल.
भुवनेश्वर कुमारची संघात एंट्री
शनिवारी वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱया अंतिम आणि निर्णायक सामन्यासाठी भुवनेश्वर कुमारचा संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने शुक्रवारी एका निवेदनात ही घोषणा केली. चौथ्या टी-20 सामन्यात खांद्याला दुखापत झालेल्या अर्शदीप सिंगच्या जागी भुवनेश्वरला संधी मिळाली आहे. बीसीसीआयने आपल्या निवेदनात लिहिले आहे, ‘हैदराबादमध्ये झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात खांद्याला दुखापत झालेल्या अर्शदीप सिंगच्या जागी भुवनेश्वर कुमारचा संघात समावेश करण्यात आला आहे. पाचव्या टी-20 सामन्यातील त्याच्या सहभागाबाबतचा निर्णय सामन्यापूर्वी घेतला जाईल.’
अर्शदीप सिंगला दुखापत
अर्शदीप सिंगला चौथ्या टी-20 सामन्यात फलंदाजी करताना दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरूपाची असल्यामुळे त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता. अर्शदीपवर वैद्यकीय उपचार सुरू असून तो या सामन्यात खेळण्याची शक्यता धूसर असल्याचे म्हटले जात आहे.
पिच रिपोर्ट
बंगळुरूच्या मैदानाची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी कुरण ठरणारी आहे. आयपीएलमध्येही या मैदानात धावांचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या सामन्यात धावांचा विक्रम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
वातावरणाचा अंदाज
बंगळुरूतील वातावरण चांगले नसल्याचे समोर येत आहे. सामनादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पाऊस हा या सामन्यात मोठी भूमिका बजावू शकतो, असे म्हटले जात आहे.



























































