
नुकत्याच विरारमध्ये पार पडलेल्या कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेतून बिहार येथे होणाऱ्या 52 व्या कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी राज्यातील 28 खेळाडूंची सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. या 28 खेळाडूंमधून अंतिम 14 खेळाडूंची यादी निश्चित करण्याआधी तरुण असूनही कुमारांच्या राज्य निवड चाचणीत वयचोरी करून खेळलेल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. या शिबिरात सराव करण्यासाठी उतरण्यापूर्वी सर्व खेळाडूंची जन्मदाखल्यांशी संबंधित सर्व कागदपत्रे यांची काटेकोरपणे तपासणी केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या हंगामी समितीत व्यवस्थापन समितीची जबाबदारी सांभाळणारे अर्जुन पुरस्कारप्राप्त कबड्डीपटू शांताराम जाधव यांनी दिली. येत्या 1 ते 4 नोव्हेंबरदरम्यान कुमार राष्ट्रीय स्पर्धा रंगणार असून त्यासाठी 17 ते 26 ऑक्टोबरदरम्यान विरार पूर्वेला वंडर नेचर येथे सराव शिबीर पार पाडले जाणार आहे.
शिबिरासाठी निवडलेले संभाव्य खेळाडू
उजवा कोपरा ः आदित्य सोहनलाल (पुणे), अतुल जाधव (परभणी), ओंकार दारकुंडे (अहिल्यानगर), नंदकिशोर पाटील (कोल्हापूर); डावा कोपरा ः ऋषिकेश जाधव (पुणे), वैभव इनकर (सातारा), सिद्धेश भोसले (मुंबई शहर); उजवा पाचवा ः प्रसाद दिघोळे (पुणे), जीवन जाधव (परभणी), प्रसाद बोंबले (ठाणे), शिवम गोरडे (अहिल्यानगर); डावा पाचवा ः सूरज राठोड (रत्नागिरी), समीर हिरवे (रायगड), धीरज शेजुल (जालना); डावी चढाई ः वीरेंद्र मंडलिक (पुणे) विवेक शिंदे (बीड), शैलेश शेडगे (रत्नागिरी), सर्वेश नेहरे (कोल्हापूर), लखन राठोड (जालना), समवेद पाटील (पालघर); उजवी चढाई ः सारंग रोकडे (परभणी), ओम पावशे (रायगड), अजिंक्य कटले (लातूर), रमेश गायकवाड (परभणी), दीपक धोडे (नांदेड); अष्टपैलू ः मनीष धनावडे (ठाणे), कृष्णा सिंग (मुंबई उपनगर), ओम शिंदे (सांगली).


























































