
मराठी रंगभूमीवरील ‘अलबत्या-गलबत्या’ या लोकप्रिय बालनाट्याने मराठी रंगभूमीवर इतिहास रचला आहे. अद्वैत थिएटर निर्मित, रत्नाकर मतकरी लिखित आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित या नाटकाचे गुरुवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सलग 7 प्रयोग पार पडले. याची दखल घेत वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने नाटकाच्या संपूर्ण टीमला सन्मानित केले. विशेष म्हणजे पुणे महापालिका शाळेतील 6500 विद्यार्थांनी विनामूल्य या नाटकाचा आनंद घेतला.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, अद्वैत थिएटरचे निर्माते राहुल भंडारे आणि सर्वस्य प्रोडक्शनच्या निर्मात्या श्रद्धा हांडे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम पुण्यात यशस्वीपणे पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून या शिखर विश्वविक्रमी प्रयोगांना सुरुवात झाली. महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि उद्यम विकास बँकेच्या उपाध्यक्ष लीना अनास्कर यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले.
सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत चाललेल्या या विश्वविक्रमी प्रयोगाला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, सांस्कृतिक व क्रीडा विभागाचे उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्पे, लेखक – दिग्दर्शक प्रवीण तरडे, अविनाश कांबळे, सुवर्णा थिटे, संदीप विचारे, डॉ. जयंत शेवतेकर, कृष्णा आराणे हे उपस्थित होते. 50 वर्षांपूर्वी नाटकात या नाटकात भूमिका साकारणाऱ्या प्रतिभा मतकरी आणि त्यांच्या कन्या सुप्रिया विनोद या आवर्जून उपस्थित होत्या.



























































