जमनालाल बजाज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये गैरसुविधा, युवासेनेने केली पोलखोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठातील जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील गैरसुविधांमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. युवासेना सिनेट सदस्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून गैरसुविधांची पोलखोल केली. या ठिकाणी तातडीने गैरसोयी दूर करण्याची मागणी युवासेनेने केली.

जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटमधील गैरसुविधांबाबत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, मयूर पांचाळ आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई विद्यापीठ येथे प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी संचालक बसत असलेल्या मजल्यावरील शौचालय अस्वच्छ, वापरास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले. कॅण्टीन सुविधा अत्यंत वाईट होती. तळमजला परिसरात गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी, कचरा, बंद लिफ्ट, पहिल्या मजल्याच्या व्हरांड्यात अनधिकृतपणे उभारण्यात आलेली लायब्ररी, नादुरुस्त कुलर अशा गैरसोयी दिसून आल्या. या पार्श्वभूमीवर युवासेनेने कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन गैरसुविधांबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना निवेदनही देण्यात आले आहे.