गुजरातमध्ये औषध कंपनीत भीषण स्फोट; 5 कामगारांचा मृत्यू, 6 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमध्ये एका औषध कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट होऊन पाच कामगारांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. भरूच जिल्ह्यातील सायखा जीआयडीसीमध्ये सिंजील फार्माकेम कंपनीत शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान हा स्फोट झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ बचाव व मदतकार्य सुरू केले.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, वाघरा तालुक्यात सायखा जीआयडीसीमध्ये एका वर्षापूर्वीच सिंजील फार्माकेम ही कंपनी स्थापन करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान 15 केएल क्षमतेच्या रिॲक्टरचा स्फोट झाला. रिॲक्टरच्या स्फोटामुळे आणि एमडीसी (मिथिलीन डायक्लोराइड) वायूच्या गळतीमुळे कामगार आजारी पडले. स्फोटाच्या धक्क्यांमुळे प्लांटमधील अवजड यंत्रसामग्रीचे भाग आणि पत्रे विखुरले गेले.

वायू गळतीमुळे, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना आणि कामगारांना डोळ्यांना तीव्र जळजळ होऊ लागली. सर्व मृतदेह भरूच येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तर जखमींना उपचारांसाठी भरूच आणि वडोदरा येथील खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. या मोठ्या औद्योगिक अपघातानंतर, जीपीसीबी (GPCB) आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य (DISH) विभागाचे पथक प्लांटमध्ये दाखल झाले आणि त्यांनी स्फोटाचे कारण व सुरक्षा मानकांची सखोल चौकशी सुरू केली.