
सर जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी आज कमाल केली. रुग्णाच्या डोक्याच्या कवटीत तळाशी नाजूक जागी अडकलेली एक सेंटीमीटर बंदुकीची गोळी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेने यशस्वीरीत्या बाहेर काढली. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱया प्रमुख रक्तवाहिनीच्या जवळच ही गोळी अडकून बसली होती. त्यामुळे ही शस्त्रक्रिया म्हणजे मोठे आव्हान होते. मात्र डॉक्टरांनी एंडोस्कोपिक शस्त्रक्रियेने ते यशस्वी करून दाखवले.
जळगाव येथे दोन गटांतील वादात डोक्यात गोळी लागल्याने या रुग्णाला उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात आणले गेले होते. त्याला कानाच्या मागून गोळी मारली गेली होती आणि ती कवटीच्या तळाशी अडकून बसली होती. जे. जे. रुग्णालयाच्या न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख, विख्यात न्यूरोसर्जन डॉ. वर्नन वेल्हो आणि ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूरोसर्जरी विभागाचे डॉ. हृषिकेश आणि ईएनटी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. नवीन सिंग यांनी या रुग्णावर शस्त्रक्रिया केली.
सहज पोहोचता न येणाऱया भागात, मेंदूला रक्तपुरवठा करणाऱया प्रमुख रक्तवाहिन्यांपैकी एक असलेल्या इंटर्नल पॅरोटिड धमनीच्या अगदी जवळ गोळी अडकली होती. गोळीच्या लहान आकारामुळे तिचे अचूक स्थान निश्चित करणे आणि सुरक्षितपणे काढणे अधिकच गुंतागुंतीचे झाले होते. प्रगत न्यूरोनॅव्हिगेशन तंत्रज्ञान, सी-आर्म इमेजिंग आणि एंडोस्कोपिक तंत्रांच्या सहाय्याने ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. रणजित मानकेश्वर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांचेही या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.


























































