
गावागावांतील क्रिकेट गुणवंतांना आता राष्ट्रीय व्यासपीठावर धडाका दाखवण्याची संधी मिळणार आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागांतील क्रिकेटपटूंसह गायकांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी इन-डॉट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि प्रसार भारतीने किसान क्रिकेट लीगची घोषणा केली आहे.
‘खेलेगा भारत, देखेगा इंडिया’ हे ब्रीद घेऊन मैदानात उतरणाऱया या लीगमध्ये सात संघ, 140 उदयोन्मुख क्रिकेटपटू आणि 30 गायकांना संधी मिळणार आहे. देशभरातील 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांतील प्रतिभावंतांचा शोध स्मार्टफोनद्वारे घेतला जाईल. डिजिटल छाननी आणि प्रत्यक्ष चाचण्यांतून खेळाडूंची निवड होईल.
पहिल्या हंगामात पांढऱया चेंडूने 15 षटकांचे क्रिकेट रंगणार असून दुसऱया आणि तिसऱया श्रेणीतील शहरांमधील सात स्टेडियमवर 45 सामने खेळवले जातील. गायकही संघगीतांपासून संगीतचित्रफितींपर्यंत मनोरंजनाची रंगत वाढवतील. या लीगचे सामने आणि कार्यक्रम ओटीटी, दूरदर्शन आणि आकाशवाणीवर विनामूल्य पाहता व ऐकता येणार आहेत.


























































