मुख्य आरोपी आणि सूत्रधार गजाआड जात नाही, तोपर्यंत पूर्णेकरांचा विषय संपणार नाही; संजय राऊत यांचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी भेट घेऊन निवेदन दिले. “काळजी करू नका, सरकार तुमच्या सोबत आहे,’’ असा विश्वास कुटुंबीयांना दिला. तसेच 2 दिवसात भेटीची वेळ देण्याचे आश्वासन दिले. यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे ते म्हणाले. तसेच जोपर्यंत मुख्य आरोपी आणि सुत्रधार गजाआड जात नाहीत तोपर्यंत पूर्णेकरांचा विषय संपणार नाही, असेही ठणकावले. ते शनिवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका योग्य असून पूर्णेकरांच्या खुनाचा तपास हा निष्पक्ष पद्धतीने व्हायला पाहिजे. ठाण्यातील शिंदे गटाचे प्रमुख त्या हत्येच्या कटात सहभागी आहेत. माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. हे जर राज्याच्या गृहमंत्र्यांच्या लक्षात आले असेल आणि त्यांनी निष्पक्ष तपासाची ग्वाही दिली असेल तर मी त्याचे स्वागत करतो.

आम्ही वाट बघतोय आणि दसऱ्यानंतर अधिक गोष्टी समोर घेऊन येईल. कालच माझी राजन विचारे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा झाली. दसऱ्यानंतर मी परत ठाण्यात जाऊन पूर्णेकर कुटुंबाला भेटून त्यांच्याकडे जी वेगळी माहिती आहे ती लोकासमोर आणणार. त्यामुळे जोपर्यंत मुख्य आरोपी आणि सूत्रधार गजाआड जात नाहीत तोपर्यंत पूर्णेकरांचा विषय संपणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

काळजी करू नका, सरकार तुमच्या सोबत, मुख्यमंत्र्यांची राम पूर्णेकर यांना ग्वाही