तिरंग्याला विरोध करणारे राज्य उलथवून टाकले पाहिजे; लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष प्रत्येक आंदोलन ‘रेजीम चेंज’साठीच करतो! – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील आंदोलनादरम्यान ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केलेल्या ‘रेजीम चेंज’ या विधानावरून आदळआपट करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. राजवट बदलायची हे लोकशाहीला धरून केलेले विधान आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष प्रत्येक आंदोलन रेजीम चेंजसाठी करतो. देशामध्ये आणि जगामधील प्रत्येक प्रखर आंदोलन हे रेजीम चेंजसाठीच होते. भाजपने किंवा जनसंघाने आतापर्यंत केलेली आंदोलनंही रेजीम चेंजसाठीच होती, असे संजय राऊत म्हणाले.

शनिवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेतला. राजवट बदलायची हे लोकशाहीला धरून केलेले वक्तव्य आहे. आम्ही सगळे हुकुमशाहीविरुद्ध, निवडणूक आयोगाविरुद्ध रस्त्यावर उतरलेलो आहोत. कारण तुम्ही गैरमार्गाने सत्तेवर आला आहेत. एकनाथ शिंदे घटनाबाह्य पद्धतीने आधी मुख्यमंत्री झाले आणि मग उपमुख्यमंत्री झाले. हे सविधानाच्या विरुद्ध असून आम्ही त्याविरुद्ध लढतोय, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष प्रत्येक आंदोलन रेजीम चेंजसाठीच करतो. तुम्ही मनमोहन सिंग पंतप्रधान असताना रस्त्यावर उतरून आंदोलन कशाकरता करत होतात? आणीबाणीमध्ये जनता पक्ष कशाकरता स्थापन केला? व्ही. पी. सिंह यांना कशाकरता पाठिंबा दिला? सत्तेवर येण्यासाठी आणि राजीव गांधी यांचा पराभव करण्यासाठीच ना, असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजकीय ज्ञानाचा दुष्काळ असल्याला टोला लगावला. हा राजकीय दुष्काळ भाजपच्या मानसिकतेत आहे. देशात आणि जगात प्रत्येक प्रखर आंदोलन रेजीम चेंजसाठीच होते. भाजपने किंवा जनसंघाने आतापर्यंत केलेली आंदोलनं रेजीम चेंजसाठीच झालेली आहेत मिस्टर फडणवीस, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.

मोदी आणि शहांची बंदी! हिंदुस्थानात तिरंगा फडकवू नका!! जमावबंदी झुगारून हजारोंचा जमाव दिल्लीत रस्त्यावर उतरला

निवडणूक आयोग आणि यंत्रणांना हाताशी धरून गैरमार्गाने, चुकीच्या पद्धतीने निवडणुका जिंकल्या असतील तर ताबडतोब रेजीम चेंज व्हायला पाहिजे. बांगलादेशमधील बंड त्यासाठीच झाले. तिकडल्या मुख्य निवडणूक आयुक्तांना हिरव्या लुंगीवर रस्त्यावर आणले. कारण त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्याप्रमामे तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना निवडणूक जिंकण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करू दिला. त्यामुळे जनता रस्त्यावर आली आणि हिंदुस्थानातही तेच चालले आहे. याला अराजक नाही तर जनतेचे बंड म्हणतात. नेपाळमध्येही तिकडच्या राज्यकर्त्यांच्या भ्रष्टाचारामुळे मुलं रस्त्यावर आली आणि श्रीलंकेतही तशाच पद्धतीचे आंदोलन झाले. प्रत्येक ठिकाणी आंदोलनाचा केंद्रबिंदु निवडणूक आयोग होता, असेही संजय राऊत म्हणाले.

देशामध्ये तिरंगा फडकवायला नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस विरोध करत असतील तर रेजीम चेंज व्हायला पाहिजे. तिरंगा फडकवण्यासाठी कशाला परवानगी पाहिजे किंवा अटक करता? ब्रिटिशांनी तिरंगा फडकावू दिला नाही म्हणून रेजीम चेंज झाले. तुम्हीही फडकावू देत नाही, तर तुमचे रेजीम का चेंज करायचे नाही? तुम्ही तिरंग्याला विरोध करताय. तुम्ही 52 वर्षे तुमच्या कार्यालयावर तिरंगा फडकावला नाही. तिरंग्यावरील तुमचा राग समजू शकतो. तो तुमचा व्यक्तिगत विषय आहे. पण भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अअशफाक उल्ला खान यांच्या वयाच्या तरुण मुलांना तिरंगा फडकवू देत नसाल तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अअशफाक उल्ला खान यांनी केले त्याची पुनरावृत्ती देशात होऊ शकते. देशात गोडसे निर्माण होणार नाहीत, पण भगतसिंग होतील, असेही संजय राऊत म्हणाले.

Neha Bora Release – नेहा बोरा यांची पोलिसांकडून पहाटे सुटका; अभिजीत दीपके यांना आज न्यायालयात हजर करणार