
बॉलीवूड अभिनेता अजय देवगण याच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामाप्रकरणी पालिकेने तोडक कारवाई केली आहे. नोटीस बजावूनही अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवल्याने पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बंगल्यातील बेकायदा बांधकाम पाडले. जूहू येथील कपोल को-ऑप. सोसायटीत अभिनेता अजय देवगण व अभिनेत्री काजोल देवगण यांचा बंगला असून या बंगल्याच्या रिनोव्हेशनचे काम करण्यात येत होते. पार्टिशन वॉलमध्ये बदल, खिडक्यांचे बांधकाम व इतर कामे करण्यात येत होती; मात्र यासाठी पालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. पालिकेने याप्रकरणी 10 सप्टेंबर रोजी अजय देवगणला नोटीस बजावली होती.
चिल्ड्रन एड सोसायटीच्या जागेतील अतिक्रमणावर लवकरच कारवाई
मानखुर्द येथील चिल्ड्रन होम सोसायटीच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने बजावलेल्या नोटीसविरोधात न्यायालयात दावा दाखल करणाऱया अर्जदाराला दिलासा देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने सदर दावा फेटाळून लावल्याने अतिक्रमण हटविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मानखुर्दच्या चिल्ड्रन एड सोसायटीच्या जागेत दीपक गोहिल याने बांधकाम केले होते. जिल्हाधिकाऱयांनी 12 ऑक्टोबर रोजी बांधकाम हटविण्याची नोटीस बजावली. गोहिलने याविरोधात न्यायालयात सूट दाखल केले. या अर्जावर न्यायाधीश एस. एम. पाटील यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. चिल्ड्रन एड सोसायटीच्या वतीने ऍड. विनोद सातपुते यांनी अर्जाला तीव्र विरोध केला.


























































