
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ‘पादचारी प्रथम’ उपक्रमात प्रशासनाने धडक कारवाई करताना 399 फुटपाथवरील तब्बल 2 हजार 803 अतिक्रमणे, फेरीवाले हटवले आहेत. यामुळे मुंबईतील तब्बल 500 किमी रस्ते फेरीवाला-अतिक्रमणमुक्त झाले आहेत.
मुंबईकरांना पदपथांवरून सुरक्षितपणे आणि विनाअडथळा चालता यावे, या उद्देशाने पालिकेने ‘पादचारी प्रथम’ हे विशेष अभियान हाती घेतले आहे. या मोहिमेत फुटपाथवरील अतिक्रमणे हटवणे, आवश्यकतेनुसार पदपथ रुंद करणे, पदपथांची दुरुस्ती करणे तसेच रस्ते आणि परिसर स्वच्छ ठेवणे यावर या अभियानांतर्गत भर देण्यात येत आहे. या कारवाईत प्रामुख्याने रुग्णालये, शाळा-महाविद्यालये, रेल्वे-बस स्थानकांसह सार्वजनिक ठिकाणांचा समावेश आहे. हे अभियान नियमित सुरू ठेवण्याचे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पालिकेच्या बैठकीत आयुक्त भिडे यांनी हे निर्देश दिले. अधिकृत दुकाने व स्टॉल्सच्या पुनर्वसनात क्षेत्रफळाची पडताळणी करावी, अनधिकृत रॅम्प हटवून पदपथांची मूळ रचना पुनर्स्थापित करावी, पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले.
अनधिकृत पार्ंकगला आळा घाला
फुटपाथवर दुचाकींच्या अनधिकृत पार्किंगला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. यासाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून नियमित देखरेख व प्रभावी कारवाई करावी. परिसरात सार्वजनिक वाहनतळासाठी आरक्षित जागा असल्यास तिचा विकास करून नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी, पदपथांची रुंदी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून आवश्यक त्या ठिकाणी नियोजनबद्ध वाहनतळाचे मार्किंग करावे. तसेच रस्त्याच्या कडेला वाहनतळासाठी योग्य जागा उपलब्ध असल्यास स्वतंत्र पार्किंग-बे विकसित करून अनधिकृत पार्किंगला प्रतिबंध घालावा, असे निर्देशही आयुक्त भिडे संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा – आयुक्त
पदपथांवर दुकाने, स्टॉल्स उभारणे किंवा विविध प्रकारचे साहित्य ठेवून पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणे खपवून घेतले जाणार नाही. स्थानिक परिस्थिती आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन पदपथ अतिक्रमणमुक्त करावेत. केवळ दिखाऊ कारवाई न करता, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर व परिणामकारक कारवाई करून पादचाऱ्यांसाठी पदपथ कायमस्वरूपी मोकळे ठेवावेत, असे निर्देश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले आहेत.
























































