कॅन्सर रुग्णावरील महागड्या वैद्यकीय तपासण्यांचा आर्थिक ताण कमी होणार; महात्मा फुले, आयुष्मान भारत योजनेत पीईटी-सीटी तपासणीचा समावेश, 13 प्रकारच्या कर्करोगांसाठी स्वतंत्र तपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महागड्या पीईटी-सीटी चाचण्यांमुळे वैद्यकीय चाचण्यांना अनेकदा विलंब होतो, पण आता कर्करोगाचे निदान आणि उपचार रखडण्याची वेळ येणार नाही. कारण कर्करोगाचे अचूक निदान आणि वेळेत उपचार होण्यासाठी राज्य सरकारने याही तपासण्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे 63 उपचार पॅकेजमध्ये अतिरिक्त निदान प्रक्रिया, तर 13 प्रकारच्या कर्करोगांसाठी स्वतंत्र तपासणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे कॅन्सर रुग्णांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. पीईटी-सीटी तपासणीचा खर्च परवडत नसल्याने अनेक रुग्ण ही तपासणी पुढे ढकलतात किंवा टाळतात. त्यामुळे आजाराचे अचूक स्वरूप समजणे आणि योग्य उपचार वेळेत सुरू करणे यामध्ये अडथळे निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन नागरिक आणि संबंधित रुग्णालयांकडून या तपासणीचा आरोग्य योजनांमध्ये समावेश करण्याची मागणी होत होती. त्यानुसार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार स्वतंत्र अभ्यास समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशींचा विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी 44 उपचार पॅकेजमध्ये पीईटी-सीटी तपासणीचा अतिरिक्त निदान प्रक्रिया म्हणून समावेश होता. आता ही सुविधा 63 उपचार पॅकेजपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. निवडक 13 प्रकारच्या कर्करोग उपचारांसाठी पीईटी-सीटी स्कॅन स्वतंत्र किंवा नियमित निदान प्रक्रिया म्हणून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना आवश्यकतेनुसार या तपासणीचा लाभ घेता येईल. या सुविधेचा लाभ देताना रुग्णालयांना शासन निर्णयातील अटींचे पालन करावे लागणार आहे. तपासणीपूर्वी पूर्वमान्यता घेणे बंधनकारक आहे.

पीईटी–सीटी तपासणीचे निर्धारित दर

संपूर्ण शरीर  20,400 रुपये

मेंदू  14,650 रुपये

गॅलियम 68 15,000 रुपये

हृदय 9,400 रुपये