
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आता एक अनोखा प्रयोग हाती घेतला आहे. तब्बल ३० बाय ३० फुटांचा विशाल पिंजरा तयार करण्यात आला असून, संपूर्ण राज्यात अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात असलेल्या सामदा परिसरात टी-१२२ या वाघाने गेल्या काही दिवसांत तीन जणांचा बळी घेतला असून, एका व्यक्तीला जखमी केले आहे. या वाघाला पकडण्यासाठी डार्ट मारून बेशुद्ध करण्याची पारंपरिक पद्धत वापरण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्याला यश आले नाही. विशेष म्हणजे हा वाघ वारंवार एकाच परिसरात शिकार करण्यासाठी येतो. आजूबाजूला मानवी हालचाली किंवा माणसाचा सुगावा लागताच तो त्या ठिकाणाहून निघून जातो आणि पुन्हा तिथे परत येत नाही. त्यामुळे त्याला जेरबंद करण्याचे वनविभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, वाघाच्या हालचालींचा अभ्यास करून त्याला पकडण्यासाठी मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवत सुरक्षित परिसर तयार करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. यासाठी तब्बल ३० बाय ३० फुटांचा विशाल पिंजरा उभारण्यात असल्याचं विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांनी सांगितलं. या अभिनव प्रयोगाच्या माध्यमातून टी-१२२ वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश येते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



























































