जीवाशी खेळ… गुजरातमध्ये बनावट टोमॅटो केचप तयार करणारा कारखाना सील; 10,650 किलो माल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील अहमदाबाद शहरात बनावट केचप तयार करणाऱ्या कारखान्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने छापा टाकला आहे. शहराच्या गोटा परिसरात हा कारखाना असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून 10 हजार 530 किलो भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोग्य विभागाने हा कारखानाही सील केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

गोटा परिसरातील मेल्डी इस्टेटमध्ये असलेल्या आय श्री खोडियार गृह उद्योग या कारखान्यावर आरोग्य विभागाने छापा टाकला. या कारखान्यामध्ये टॉमॅटो केचप, चटणी आणि सिरप यासारखी उत्पादने कृत्रिम रंगाचा वापर करून तयार केली जात होती. अहमदाबाद पालिकेच्या आरोग्य विभागाने छापा टाकत कारखान्यातून तयार माल आणि कच्चा माल जप्त केला आहे. यात विक्रीसाठी तयार असलेला 5 हजार किलो माल आणि 5 हजार किलोहून अधिक कच्च्या मालाचा समावेश आहे.

सदर कारखान्यामध्ये टॉमॅटो केचप बनवण्यासाठी टॉमॅटो ऐवजी बटाट्याचा वापर केला जात होता. बटाट्यांवर प्रक्रिया करून त्याची पेस्ट बनवली जात असे आणि त्याचे पावडरमध्ये रुपांत केले जात असे. त्यानंतर ही पावडर पाणी, कृत्रिम रंग आणि इतर गोष्टी मिसळून टॉमॅटो केचप म्हणून बाजारात विकली जात होती, अशी माहिती महापालिकेचे अधिकारी महेंद्र पटेल यांनी दिली.

सील करण्यात आलेल्या कारखान्यामध्ये अधिकाऱ्यांना केचपने भरलेले मोठे स्टेनलेस स्टीलचे मिक्सिंग भांडे, पॅकिंग केलेले केचपची पाकिचे, कच्च्या मालाची पोती, पेस्टसारखे पदार्भ भरलेले ड्रम आणि तयार उत्पादनांचे डबे आढळून आले. तसेच स्टोरेजमध्ये कच्चा आणि तयार माल ठेवण्यात आला होता. कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छताही दिसून आली.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्यातून जप्त केलेला माल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला असून कारखाना सील केला आहे. तसेच परवाना रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू करण्य्यात आली आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे बेहरामपुरा येथेही एका कारखान्यावर काही दिवसांपूर्वी अशी कारवाई करण्यात आली होती. तिथेही अशाच पद्धतीने बनावट टॉमॅटो केचप तयार केले जात असल्याचे उघडकीस आले होते. या कारवाईदरम्यान 2 हजार किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.