
गुरुग्राममधील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. फरहाना आणि मोहम्मद अस्लम अशी त्या दोघांची नावे आहेत. अस्लमने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी तो काम करत असलेल्या कंपनीला मेल पाठवून त्यांच्या मृत्यूबाबत वडिलांना व घरमालकाला कळवावे असे सांगितले आहे. तसेच त्याने घराच्या भिंतीवर आम्ही हे जग सोडतोय असे देखील लिहून ठेवले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्लमने त्याच्या कंपनीला तो आत्महत्या करतोय असे कळवले होते. कंपनीतील त्याच्या सहकाऱ्यांनी जेव्हा तो मेल पाहिला त्यानंतर त्यांनी तत्काळ त्याबाबत पोलिसांना कळवले. पोलीस जेव्हा अस्लमच्या गुरुग्राममधील ‘एम३एम मरिना’ (M3M Marina) सोसायटीतील घरी पोहोचले तेव्हा त्यांना अस्लम व फरहाना दोघेही मृतावस्थेत आढळले. महिलेचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता तर तरुणाचा मृतदेह छताच्या पंख्याच्या हुकला लटकलेल्या अवस्थेत होता.
फरहाना ही मूळची केरळची रहिवासी होती, तर अस्लम बंगळुरूचा होता. अस्लम गुरुग्राममधील सेक्टर ५८ मधील एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता, तर फरहाना गृहिणी होती.
आत्महत्या करण्यापूर्वी अस्लमने आपल्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक ईमेल पाठवला होता. त्यामध्ये आपण जीवन संपवणार असल्याचे त्याने नमूद केले होते. तसेच वडिलांचा आणि घरमालकाचा मोबाइल क्रमांक देऊन त्यांना याबद्दल माहिती द्यावी, अशी विनंती केली होती. ईमेल मिळताच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घरमालकाशी संपर्क साधला आणि त्यानंतर पोलिसांना देखील कळवले. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता.
प्राथमिक तपासानुसार, अस्लमने स्वतः गळफास घेण्यापूर्वी फरहानाचा गळा आवळून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या हत्येमागचे आणि आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
अस्लम नैराश्यात होता
अस्लमच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार अस्लमला डिप्रेशन आले होते व गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.




























































