Manipur Violence – मणिपूरच्या कामजोंग जिल्ह्यात अतिरेक्यांकडून गोळीबार; एकाचा मृत्यू, चार जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला असून कामजोंग जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात अन्य चार जण जखमी झाले आहेत. अतिरेक्यांनी शनिवारी दुपारी कुकी समुदायाचे गाव असलेल्या चसाद येथे गोळीबार केला. यानंतर स्थानिक सशस्त्र गट आणि संशयित अतिरेक्यांमध्ये संध्याकाळपर्यंत चकमक सुरू होती.

या हल्ल्यात गावप्रमुख थांगजाहू हाओकिप (48) यांच्यासह खैलुन हाओकिप, सेइखोहो, हेगिन हाओकिप आणि सेइपाओ हाओकिप हे जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे उपचारादरम्यान सेइखोहो याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, ‘कमिटी ऑन ट्रायबल युनिटी’ने एका निवेदनाद्वारे चसाद गावावरील या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच राज्य सरकारला तिथे केंद्रीय सुरक्षा दलांची नियुक्ती करण्याचे आवाहन केले आहे, असे इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.