
परभणी येथील एमआयडीसीतील मे. मोती नमकीन प्रायव्हेट लिमिटेड या फरसान उत्पादक कारखान्यावर सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली. या कारवाईत ६३ लाख १४ हजार रुपये किमतीचा २२ हजार ५५० किलो मिक्स शेवचा साठा जप्त करण्यात आला असून, कारखान्याचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी वैभव एम. ठोंबरे यांनी शुक्रवारी केलेल्या तपासणीत स्वच्छतेचा अभाव, खाद्यतेलाच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या नोंदी नसणे, कच्च्या मालाच्या खरेदीची बिले उपलब्ध नसणे आणि कामगारांकडून स्वच्छतेच्या नियमांचे पालन न होणे यांसह अनेक त्रुटी आढळल्या. तपासणीत कारखान्याला ८८ पैकी केवळ ३४ गुण मिळाले. जप्त साठ्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अंतिम अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.
जिंतूरमध्ये तीन तेल कारखान्यांवर छापे
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राबविलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत जिंतूर तालुक्यात शुक्रवारी मोठी कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करून खुले खाद्यतेल विक्रीसाठी पॅकिंग करणाऱ्या तीन कारखान्यांवर छापे टाकून सुमारे १७ लाख ७५ हजार रुपयांचे संशयास्पद खाद्यतेल जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे शहरातील खाद्यतेल विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी के. एच. मले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिंतूर-मोंढा रोड परिसरातील मे. मयूर एजन्सीज, औद्योगिक वसाहतीतील मे. अर्थव एजन्सीज आणि येलदरी रोडवरील मे. वरद ऑईल इंडस्ट्रीज या तीन ठिकाणी तपासणी केली. या कारवाईत मे. मयूर एजन्सीज येथून सुमारे ६ लाख २६ हजार ९२० रुपये किमतीचे सोयाबीन, सनफ्लॉवर व पामतेल, मे. अथर्व एजन्सीज येथून ६ लाख ७० हजार १६० रुपये किमतीचे सोयाबीन तेल व पाऊचेस, तर मे. बरद ऑईल इंडस्ट्रीज येथून ४ लाख ७७ हजार ८५५ रुपये किमतीचे केसर गोल्ड, हेल्थ फिट व स्वाद बँडचे तेल जप्त करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तिन्ही कारखान्यांमधील तेलाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. विक्रीसाठी तयार असलेला तेलाचा साठा सील करण्यात आला असून, तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत तो विक्री न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित तेलाची गुणवत्ता आणि नियमांचे पालन याबाबत पुढील तपासणी सुरू आहे. या कारवाईमुळे जिंतूर शहर व परिसरातील खाद्यतेल विक्री आणि पॅकिंग प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच संबंधित तेलाच्या दर्जाबाबत स्पष्टता येणार असून, दोष आढळल्यास नियमानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
























































