
”दुष्काळग्रस्त शेतकरी मेला काय आणि जगला काय याविषयी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काहीही पडलेले नाही, ते आपल्या साखर कारखान्यात, ठेकेदार, उद्योग व कमिशनबाजीमध्ये मस्त आहेत, अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले. महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी निवडणूकीतील पैशांचा खर्च, राज्यातील दुष्काळ यावरून सत्ताधाऱ्यांची सालटी काढली.
”भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाकडे पैसा प्रचंड आहे. सोमेश्वर साखर कारखान्याचे जे पॅनेल विजयी झालं त्या निवडणूकीत त्या गटाने 30 कोटी खर्च केले. जर सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणूकीत 25, 30 कोटी खर्च होत आहेत. शिक्षक पदवीधर निवडणूकीत उमेदवारांना अर्धा तोळ्याचा दागिना, पैठणी, सफारी सुट दिलं जातंय. शिक्षक पदवीधर निवडणूकीत पैशाचं वाटप होत असेल तर हे राज्य गरीब आहे असं कसं म्हणायचं? राज्याच्या तिजोरीत पैसा नाही, पण जे राज्य चालवतायत त्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या लुटीतून आलेले पैसे आहेत. सर्वात जास्त भाजप व मिंधे गटाकडे आहे. हा पैसा कुठून आला, कसा आला याबाबत जर राज्याचे मुख्यमंत्री सांगू शकले तर राज्याचे अर्ध कर्ज ते कमी करू शकतील. राज्याच्या दुष्काळाच्या संदर्भात ज्या रकमेची गरज आहे ती मंत्र्यांकडूनच घेता येतील. कॅबिनेटमध्ये मंत्र्यांचे खिसे झटकले तर त्यातूनही एक लाख कोटी जमा होतील. काल आपण पाहिले की एक माजी मंत्री नाचतायत व त्यांच्यावर दौलतजादा होतेय. ते डान्सबारमध्ये नाचावे तसे नाचतायत व त्यांच्यावर दोन मिनिटात पाच पंचवीस लाख उडवल्याचे दिसत आहे. त्यामुळे या राज्याच्या डोक्यावर कर्जआहे हे कसं मानायचं? हे सत्ताधारी हे राज्य आपले मानत नाही. सत्ताधारी पक्षाच्या आमदार खासदारांनी ठेकेदारांच्या मदतीने राज्याला लुटलेलं आहे. आणि ठेकेदारांचे 95 हजार कोटी दिलेले नाही. दुष्काळग्रस्त शेतकरी मेला काय आणि जगला काय याविषयी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काहीही पडलेले नाही. ते आपले साखर कारखाने, ठेकेदार व उद्योग व कमिशनबाजीमध्ये मस्त आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.
”मुख्यमंत्री म्हणतात किमान खर्चात कपात करायचं म्हणजे नक्की काय? हे त्यांनी स्वत:पासून केल्या पाहिजे, ते होतंय का? यांचा थाट बघा ना? तो थाट पाहिल्यावर वाटतं की खरंच या राज्यावर अकरा कोटीचं कर्ज आहे का? यांना फक्त गरिबांना रोजी रोटी मिळवून द्यायची नाही? ठेकेदारांना त्यांचे पैसे द्यायचे नाही. नमो योजना वगैरे सगळे झूठ आहे. तुम्ही तुमच्या प्रधानमंत्र्यांच्या नावाने योजना सुरू करताय पण त्याचे चार चार महिने त्याचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर गेलेले नाही. त्यामुळे बंद करून टााका ही योजना. नरेंद्र मोदींना जावं लागणार आहे त्यामुळे ही योजना बंदच होणार आहे. महाराष्ट्रासारखं राज्य कर्जाच्या ओझ्याखाली गुदमरलेलं दिसत असेल तर यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील, वसंतराव नाईक, बालासाहेब ठाकरे, शरद पवार या महान नेत्यांनी राज्य घडवण्यासाठी जे कष्ट घेतले ते वाया जातायत असं वाटतं”, असेही संजय राऊत म्हणाले.
”दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या घरात चूल पेटत नाही त्याच्या घरावर जप्तीसाठी, कर्जवसूलीसाठी बँकाचे अधिकारी जातायत आणि अपमानित करतायत, आत्महत्या करायला प्रवृत्त करतायत आणि तुम्ही नुसते प्रवचन काय झोडताय. वाईट गोष्ट आहे. लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना”, अशा शब्दात संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांची सालटी काढली.


























































