
ग्रेटर नोएडातील राबुपुरा येथे चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर शनिवारी एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाला. सुरवातीला अन्नातून विषबाधा झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. पाच जणांचा मृत्यू हा आत्महत्या असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, मयत महेशच्या मोबाईल फोनमध्ये एक व्हॉइस नोट सापडली आहे. या ऑडिओमध्ये, महेशने आपल्या दोन बहिणी आणि एका मेहुण्याला कुटुंबाच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. त्याच्या मेहुण्याच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी त्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनात विषबाधेची लक्षणे आढळून आली आहेत. डॉक्टरांनी अंतर्गत अवयव तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलीस महेशच्या दोन बहिणी आणि मेहुण्याविर केलेल्या आरोपांची चौकशी करत आहेत. तथापि, कथित छळाचा थेट संबंध पाच मृत्यूंशी आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री कुटुंब जत्रेतून घरी परतले होते. त्यानंतर त्यांनी मॅगी आणि चहा घेतला आणि ते झोपले. सकाळी कुटुंब उशिरापर्यंत उठले नाही. त्यामुळे शेजारी त्यांना उठवायला आला असता घटना उघडकीस आली. पोलिसांनी पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी खाद्यपदार्थांची तपासणी केली.
























































