
हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ पुरुष निवड समितीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. ‘टीम इंडिया’चा माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची अजित आगरकर यांच्या जागी निवड होऊ शकते. क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) मुलाखतीनंतर पोवार यांच्या नावाला पसंती दिल्याचे वृत्त ‘क्रिकबझ’ने दिले आहे. मात्र, या नियुक्तीवर अद्याप बीसीसीआयची अधिकृत मोहोर उमटलेली नाही.
१४ ऑक्टोबरला अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ ऑक्टोबरला सीएसीने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या प्रक्रियेत चार ते पाच उमेदवारांचा समावेश होता. भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर यानेही या पदासाठी मुलाखत दिली होती. या चुरशीच्या प्रक्रियेनंतर पोवार यांच्या नावावर सहमती झाल्याचे वृत्त आहे. सध्या प्रज्ञान ओझा अंतरिम स्वरूपात निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. पोवार यांची नियुक्ती झाल्यास वरिष्ठ पुरुष निवड समितीच्या रचनेत महत्त्वाचा बदल होईल.

























































