
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे दुर्गापूजा मंडपामध्ये शनिवारी रात्री चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 19 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. चोरबागान भागात ही घटना घडली असून या प्रकरणी आयोजकांसह 7 जणांना अटक करण्यात आली आहे. चेंगराचेंगरीची ही घटना कशामुळे घडली हे देखील आता समोर आले आहे. लाऊडस्पीकरवरून करण्यात आलेल्या एका घोषणेमुळे प्रचंड गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली असावी अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्तमीच्या दिवशी दुर्गापूजेसाठी मोठ्या संख्येने भाविक मंडपामध्ये दाखल झाले होते. शहरात पाऊस सुरू असल्याने रस्ते निसरडे झाले होते. पावसापासून वाचण्यासाठी अनेकांनी अरुंग गल्लीतील मंडपाचा आसरा घेतला. पाऊस सुरू असल्याने मंडपातील लोक बाहेर पडण्यास तयार नव्हते. गर्दीचा रेटा क्षणाक्षणाला वाढत होता.
प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर एकाचवेळी प्रचंड गर्दी झाली आणि काही लोक घसरून पडले. याचवेळी लाऊडस्पीकरवरून एक घोषणा करण्यात आली आणि चेंगराचेंगरी झाली. मंडपाची स्थिती खराब असून मंडप कधीही कोसळू शकतो. कृपया बाहेर पडा. लाऊडस्पीकरवरील ही घोषणा आयोजकांनी केली आणि स्वयंसेवकांनी शिट्ट्या वाजवण्यास सुरुवात केली. या घोषणुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. लोक सैरावैरा पळू लागले आणि चेंगराचेंगरी झाली. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
प्राथमिक तपासात आयोजकांच्या घोषणेमुळे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनीही पत्रकारांशी बोलताना म्हटले. या घटनेच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून भादवि कलम 105 आणि 110 अंतर्गत गुन्हा दाखल करत दुर्गापूजा आयोजकांसह 7 जणांना अटक केली आहे.
News Alert ! Seven people, including Chorbagan Durga Puja organisers, arrested for pandal stampede in Kolkata: Police
— Press Trust of India (@PTI_News) October 18, 2026




























































