
पती मुलीवर अत्याचार करत असल्याचे समोर आल्यानंतर एका महिलेने त्याच्या डोक्यात वार करून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. नंतर त्या महिलेने ही हत्या अपघात असल्याचे दाखवण्यासाठी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकला. मात्र पोलिसांना संशय आल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता एक भयंकर सत्य समोर आले.
केरळमधील कोची येथे रेल्वे रुळाजवळ एका ३१ वर्षीय मजुराचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला हा प्रकार रेल्वे अपघाताचा वाटत असला तरी, पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात ही पूर्वनियोजित हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. अल्पवयीन सावत्र मुलीचा लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या रागातून पत्नीनेच पतीच्या डोक्यात वार करून त्याचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळाजवळ फेकून दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबरच्या रात्री एर्नाकुलम नॉर्थ आणि एडापल्ली रेल्वे स्थानकांदरम्यान एका लोको पायलटने रुळाजवळ पडलेला मृतदेह पाहिला. माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासणीत संबंधित व्यक्तीचा मृत्यू रेल्वेच्या धडकेने झालेला नसून संशयास्पद पद्धतीने झाल्याचे डॉक्टरांच्या आणि पोलिसांच्या लक्षात आले. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान मृत व्यक्ती ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले. तो कुटुंबियांसह पुथुक्कलावट्टम परिसरात रेल्वे रुळाजवळच राहत होता. पोलिसांनी तातडीने त्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान त्याच्या पत्नीच्या जबाबात मोठ्या प्रमाणावर विसंगती आढळली. संशय बळावल्याने एलमक्करा पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांना दिलेल्या माहितीत आरोपी महिलेने सांगितले की, मृत व्यक्ती हा तिचा दुसरा पती होता. तिच्या पहिल्या पतीपासून तिला एक १६ वर्षांची मुलगी आहे. अनेक वर्षांपासून ते एकत्र राहत असून रोजंदारीवर काम करत होते. घटनेच्या रात्री पतीने १६ वर्षीय मुलीशी अश्लील गैरवर्तन करत तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या महिलेने पतीच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून तिने मृतदेह फरफटत नेत रेल्वे रुळाजवळ टाकून दिला.
पोलिस आता अल्पवयीन मुलीचा स्वतंत्र जबाब नोंदवणार आहेत. महिलेच्या आरोपानुसार या प्रकरणात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करायचा की नाही, याचा निर्णय मुलीच्या जबाबानंतर घेतला जाईल. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. एलमक्करा पोलीस या हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

























































