विमानात बॉम्ब आहे… शाळकरी मुलीचा प्रँक, अहमदाबाद-हैदराबाद विमानात घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदाबादहून हैदराबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरली आणि एकच गोंधळ उडाला. यानंतर हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर एका शाळकरी मुलीने बॉम्ब असल्याचा प्रँक केल्याचे उघड झाले.

जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, इयत्ता सातवीत शिकणारी 12 वर्षांची मुलगी इतर विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत शाळेच्या सहलीवरून शनिवारी हैदराबादला परत येत होती. विमानात असताना तिने तिच्या शेजारी बसलेल्या एका वर्गमित्राला गंमतीने विमानात बॉम्ब असल्याचे सांगितले. जवळच असलेल्या क्रू मेंबरने मुलीचे बोलणे ऐकले.

सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर क्रूने तात्काळ पायलटला सतर्क केले. यानंतर सुरक्षा यंत्रणांनाही सतर्क करण्यात आले. विमान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच संपूर्ण विमानाची कसून तपासणी करण्यात आली. सुरक्षा दलांना विमानात कोणतीही संशयास्पद किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही.

मुलगी अल्पवयीन आहे आणि तिने कोणताही वाईट हेतू न ठेवता, नकळतपणे ते विधान केले आहे. त्यामुळे, तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.